कुंड पर्यटन स्थळ निघोज - टाकळी हाजी निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार . निसर्गाचा वैशिष्ट्यपूर्ण अविष्कार - रांजणखळगे

Aditya

निसर्गाचा वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार - रांजणखळगे
निघोज आणि टाकळी हाजी हे गाव तेथील रांजणखळग्यांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे.पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या शेवटी टाकळीहाजी नावाचे गाव आणि नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्याचे निघोज गाव यांच्यी सीमेवरून कुकडी नदी वाहते. नदीच्या दोन्ही काठांवर बेसॉल्ट खडक आहे.  पुणे जिल्ह्यातील शिरुर आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर ह्या दोन तालुक्यांच्या सिमेवरील तसेच पुण्यापासुन 75 कि.मी व अहमदनगर पासून 70 कि.मी.अंतरावर असलेल्या टाकळी हाजी , निघोज येथील, कुकडी नदीच्या पात्रात असलेल्या खडकात पाण्याच्या अव्याहत प्रवाहाने नैसर्गिकरित्या जे असंख्य खड्डे तयार झालेले आहेत तेच रांजणखळगे. नैसर्गिकरित्या तयार झालेले हे खड्डे म्हणजे निसर्गाचा अक्षरशः विस्मयकारी चमत्कारच आहे. ह्या खड्डयांचा आकार रांजणासारखाच असून ह्या कुंडातील पाणी दुष्काळातसुद्धा आटत नाही. अनेक वर्षापूर्वी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे ह्या कुंडांची निर्मिती झाली असल्याचे काही तज्ञांचे म्हणणे आहे.

कुकडी नदीच्या पात्रात साधारण 200 मीटर लांब व 60 मीटर रुंद इतक्या भागात खडकामध्ये रांजणखळग्यांचे विविध आकार आपणास पहावयास मिळतात. या रांजणखळग्यांना स्थानिक भाषेत ‘कुंड’ म्हणतात. निसर्गाने बहाल केलेल्या ह्या छानशा कुंडांमुळे कुकडी नदीच्या सौंदर्यात भर पडलेली आहे.कुकडीचे रांजणखळगे देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करीत असून भौगोलिक बदलांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासकही येथे येत असतात. रांजणखळग्यांची निर्मिती कशी झाली, कोणत्या भौगोलिक कारणांमुळे झाली ह्या सर्व बाबींचा अभ्यास करण्याकरीता जगभरातील तज्ञमंडळी आवर्जून भेट देत आहेत. रांजणखळग्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील करण्यात आलेली असल्याने त्याची ख्याती संपूर्ण जगभर पसरलेली आहे. आपल्या महान महाराष्ट्रातील अजिंठा-वेरुळची लेणी, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले, हेमाडपंथी प्राचिन मंदिरे अशा अनेक अद्भूत अविष्कारांप्रमाणेच रांजणखळग्यांचे आकर्षण जगभरातील पर्यटकांना, अभ्यासकांना, तज्ञांना भूरळ पाडत आहे .


रांजणखळग्यांच्या परिसरात म्हणजेच कुकडी नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूस मळगंगा देवीची दोन मंदिरे आहेत आणि या दोन मंदिरांना जोडणारा राज्य सरकारच्या वतीने बांधण्यात आलेला झूलता पूल देखील बघण्यासारखा आहे. पूलाच्या मध्यभागी उभे राहून कुकडी नदीचे दर्शन नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूस असलेल्या रांजणखळग्यांमुळे विलोभनीय दिसते. निसर्गाचा हा चमत्कार तासन् तास बघत रहावा वाटतो.

                    - बारहाते आदित्य 

http://adityabarhate15.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

Who is Ansar shaikh ? How did he achieve his goal ?

राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

राधा ही बावरी....